बीड : कडा येथील पोलीस चौकी अंतर्गत २३ गावे, ४० हजार लोकसंख्या, २५-३० कि.मी.चा परिसर येतो मात्र गावांच्या दिमतीला केवळ एक पोलीस अधिकारी अन् पाच कर्मचारी असा रामभरोसे कारभार चालला आहे. एवढ्या मोठ्या गावांची पाटीलकी अवघ्या ५-६ कर्मचा-यांवर असल्यामुळे मलईदार धंद्यांना अच्छे दिन आलेत. तर दुसरीकडे सामाजिक शांतता धोक्यात दिसत आहे.
आष्टी तालुक्यात कड्याची बाजारपेठ सर्वांत मोठी असून, बाजार समिती, विविध बँका, शाळा, महाविद्यालय यांची संख्या अधिक असल्याने दररोज २०-२५ गावांचा नियमित संपर्क असतो. मात्र, एवढ्या मोठ्या गावाच्या पोलीस चौकीत फक्त एका अधिका-यासह पाच पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे कारभार रामभरोसे चालतो. रविवारी कड्याचा आठवडी बाजार भरतो. त्यादिवशी हमखास बाजारात वाहन, मोबाईल, महिलांच्या पर्सच्या चो-या होतात. एवढं होऊनही वरिष्ठांना परिस्थितीचे गांभीर्य दिसत नाही. सध्या २३ गावांसाठी असलेली कर्मचा-यांची अपुरी संख्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक ठरत आहे.
पोलीस चौकीअंतर्गत २२ गावे आहेत, त्यांची लोकसंख्या ४० हजार असल्याचे कळते, कड्यासह शिराळ, निमगाव चोरा, रूई नालकोल, टाकळी, दोन शेरी, घुमरी, पिंपरी, केरूळ, खिळद, लिंबोडी, धिर्डी, खाकळवाडी, पाटण, सांगवी आदी गावे आहेत. चौकीत सध्या एका सहायक पोलिस निरीक्षकासह अवघे पाच-सहा कर्मचारी कार्यरत आहेत. एवढ्या गावांसाठी बोटावर मोजण्याइतक्या कर्मचा-यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कायदा-सुव्यवस्था, सामाजिक शांतता खाकीचा धाक, अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीच आता आष्टी तालुक्यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. पोलीस चौकीत चार-पाच कर्मचारी वाढवून दिल्यास चोरट्यांच्या दहशतीखाली वावरणा-या ग्रामस्थांना मोठा आधार मिळणार आहे. पोलीस चौकीमध्ये कर्मचा-यांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस अधीक्षकांनीच लक्ष द्यावेविस्तारलेलं गाव म्हणून कडयाची बाजारपेठ तालुक्यात परिचित आहे. येथील चौकीतर्गत तेवीस गावे,पंचवीस कि.मी.परिसर,चाळीस हजाराच्या आसपास लोकसंख्या असतानाही अवघे पाच-सहा पोलिस कर्मचारी चौकीत कार्यरत आहेत.त्यामुळे सामाजिक शांततेला ठेच पोहचत आहे. एवढ्या मोठ्या गावांचा कारभार हाकताना पोलिसांची अक्षरश: दमछाक होत आहे.त्यातच पुन्हा कडा चौकीला स्वतंत्र वाहन नसल्याने या पोलीस चौकीला स्वतंत्र वाहन नसल्याने रात्री-अपरात्री काही अनुचित घटना घडल्यावर पोलिसांना हातात दांडकं घेऊन स्वत:चे पेट्रोल टाकून दुचाकीने घटनास्थळापर्यंत जावे लागते.