लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तेलंगणाहून बीडकडे येणारा ट्रक रिकामा होता. परंतु तपासाअंती ट्रकच्या खाली टायरजवळ तब्बल ६८९ किलो म्हणजे ४१ लाख ३७ हजार रुपयांचा गांजा लपवून ठेवल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, गांजा, ट्रक व एकास ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री मांजरसुंबा येथे स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती.परराज्यातून मराठवाड्यात विक्री होत असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली. मात्र, खात्रीलायक माहिती नसल्याने अडचणी येत होत्या. शनिवारीही तेलंगणा येथून एपी १६ टीवाय १२०६ क्रमाकांच्या ट्रकमधून बीडला गांजा येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ स्था. गु. शा. चे पो. नि. घनश्याम पाळवदे यांना कारवाईसाठी रवाना केले.
मांजरसुंब्यात ट्रक अडवून कारवाई केली. यावेळी त्यांना ट्रक रिकामा दिसला. मात्र, याच ट्रकमध्ये गांजा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने ते ही अचंबित झाले. शेवटी त्यांनी ट्रकच्या खाली टायरजवळ पाहिले. यावेळी नवीन नटबोल्टने फिट केलेला बॉक्स आढळला. त्यात तब्बल ६८९ किलो गांजा आढळला. गांजा लपवण्याची ही शक्कल पाहून पोलिसही आश्चर्यचकीत झाले.दरम्यान, रविवारी नेकनूर पोलीस ठाण्यात करुणाकार कुमारस्वामी इज्जेगिरी (रा. वरंगळ, तेलंगणा) याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला. करुणाकार ताब्यात असून, इतरांचा शोध सुरु आहे. स्था. गु. शा. चे स. पो. नि. दिलीप तेजनकर हे पुढील तपास करीत आहेत.बीडमधील माफियांचा शोध सुरुतेलंगणा राज्यातून आलेला गांजा बीडमध्ये नेमका कोणाकडे येत होता याबाबत पोलीस तपास करीत आहेत. अनेकांची नावे समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र, अद्याप त्यांनी कोणत्याही नावाला दुजोरा दिलेला नाही. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, घनश्याम पाळवदे हे यांचे प्रकरणावर बारीक लक्ष आहे.