लोकमत न्यूज नेटवर्कबीड : श्री क्षेत्र नारायणगडाचा विकास आराखडा तयार झाला असून, येत्या दोन वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण होतील. २५ कोटी रुपयांच्या निधीसह रस्त्यांच्या कामांसाठी १५ कोटी आणि पाणीपुरवठ्यासाठी जवळपास ४ कोटी रुपये या योजनांवर खर्च होणार आहेत, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा आ. विनायक मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
२५ कोटी रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. या दौ-याच्या निमित्ताने पाहणी करण्यासाठी आ. विनायक मेटे, विश्वस्थ माजी आ. राजेंद्र जगताप, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, अनिल घुमरे, तहसीलदार अविनाश शिंगटे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुणे येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरद्वारे थेट नारायणगडावर येतील आणि कार्यक्रम आटोपून रवाना होतील. सध्यातरी या कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही कार्यक्रम नाही. गडावर भक्त निवास, चार कक्षांचे विश्रामगृह, २५ हजार भाविक बसतील एवढे सांस्कृतिक सभागृह, दोन हजार भाविक क्षमतेचे दोन प्रसादालय, एक हजार जनावरांसाठी गोशाळा, पोलीस मदत केंद्र, भोजनालय, विक्री केंद्रे, वस्तू संग्रहालय, सिमेंट क्राँक्रिटचे वाहनतळ, बसस्थानक, जल व्यवस्थापन, पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी २५ सुलभ शौचालय, मंदिर परिसरात दगडी फरशी बांधकाम, चारही दिशांना प्रवेशद्वार आदी कामे होणार आहेत.विकास कामांसदर्भात आ. मेटे म्हणाले, मुख्य रस्ता ते श्री क्षेत्र नारायणगडास जोडणाºया चारही दिशेने रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. नवगण राजुरीकडून येणारा सात किमीचा रस्ता, साक्षाळपिंप्रीकडून येणारा रस्ता (४ किमी), केतुराकडून येणारा जोडरस्ता (४ किमी), पौंडूळ क्र. १, २, ३ कडून येणारा जोडरस्ता (६ किमी), अंतर्गत रस्ते (२ किमी) आणि रिंगरोड (६ किमी) रस्त्याची कामे प्रस्तावित आहेत.
या कामावर १५ कोटी रुपये खर्च होईल. याशिवाय गडावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी जवळपास ११०० झाडे लावण्यात येतील. उर्वरित १५ हजार झाडे पावसाळ्यात लावण्याचा मानस आहे. ही झाडे जगविण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन केली जाणार आहे. गडावरील भाविकांसाठीही पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून, ती ही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.