बीड: तालुक्यातील चऱ्हाटा येथे २०१४-१५ मध्ये ५ कोटी रुपये निधी खर्च करुन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवास स्थान उभारण्यात आले. परंतु मागील आठ वर्षापासून या इमारतीसाठी रोहित्र न बसविल्याने वापराअभावी अधिकारी निवास स्थान पडून आले. वीज नसल्या कारणाने अधिकारी मुख्यालयी रहात नाहीत. या ठिकाणी रोहित्र बसवावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी साेमवारी आंदोलन केले.
बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथे जिल्हा वार्षिक योजना २०१४-१५ अंतर्गत ५ कोटी रुपये खर्च करून टोलेजंग प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली. रोहित्र बसविण्यात आले नसल्याने ही इमारत विजेअभावी शोभेची वस्तू बनली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या इमारतीला रोहित्र न बसवल्याने विद्युत पुरवठा नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी रहात नाहीत. वीज पुरवठा नसल्याने आरोग्य केंद्रात डिलिव्हरी, शस्त्रक्रिया तसेच आंतररूग्ण आदि सुविधा उपलब्ध नाहीत.
परिणामी रुग्णांची गैरसोय होत असून रुग्णांना उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करत बीडला यावे लागते. तसेच आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर रहात असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या प्रकरणी वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सुद्धा उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जे कर्मचारी वारंवार गैरहजर असतील त्यांची चौकशी करुन करवाई करावी अशी मागणी सामजिक कार्यकर्त्यांनी केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, शेख युनुस,सुदाम तांदळे, मुबीन शेख, मुस्ताक शेख, शिवशर्मा शेलार, सुभाष बांगर आदि सहभागी होते.