केज : कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष देऊन नेकनूर येथील दांपत्याकडून ५ लाख व २ तोळे सोने घेऊन त्यांना खोटे सोने देत राजस्थानी भामट्यांनी पोबारा केला. ही घटना जुना दवाखाना परिसरात सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. भामट्यांनी दिलेले सोने खोटे असल्याचे कळाताच दांपत्याने तत्काळ पोलीस ठाणे गाठले.
नेकनूर येथील शिक्षक कॉलनी भागात वास्तव्यास असलेले मेघराज गमे हे शेती करतात. तर त्यांच्या पत्नी विद्या गमे या घरी शिलाई काम करतात. गुरुवारी ( दि. २८ ) दुपारी एक राजस्थानी दाम्पत्य विद्या यांच्याकडे कपडे शिवून घेण्याच्या निमित्ताने आले. यावेळी त्यांनी आम्ही इथे रस्त्याच्या कामासाठी आल्याची थाप मारत त्यांच्याशी ओळख वाढवली. डोम दिवसानंतर परत येत दांम्पत्याने चांदीचे नाणे दाखवून आम्हाला रस्त्याचे काम करताना अशा प्रकारची नाणे व अर्धा किलोहून अधिक सोने सापडले असल्याचे सांगितले. आता ओळख झाल्याने तुम्हाला कमी किंमतीत देतो असे आमिष दिले. एक सोन्याचा मणी त्यांनी विद्या यांना देत खात्री करण्यास सांगितले. खात्री झाल्यानंतर विद्या यांनी पैसे जमा करण्यास दोन दिवस लागतील असे सांगितले.
सोमवारी दुपारी संबंधित राजस्थानीने विद्या यांना सोने घेऊन जाण्यासाठी केजला बोलावले. गमे दाम्पत्य दुपारी ४.३० वाजता केजच्या शिवाजी चौकात दाखल झाले. बसस्थानकाच्या बाजूने शिवाजी चौकाकडे आलेल्या दोन राजस्थानी भामट्यांनी त्यांना उमरी रस्त्याकडून जुन्या दवाखान्याच्या परिसराकडे घेऊन गेले. ठरल्याप्रमाणे ५ लाख रुपये व २ तोळे सोन्याचे दागिने त्यांना दिले. त्यानंतर दांम्पत्याने लागलीच खोटे दागिने देऊन तेथून पोबारा केला. त्यानंतर हे सोन्याचे मणी खरे आहेत, याची खात्री केली असता ते नकली असल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे कळताच गमे दाम्पत्याने केज पोलीस ठाणे गाठून घडलेला हकीकत पोलिसांना सांगितली. याप्रकरणी दोघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मुंडे करत आहेत.