बीड/मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडमधील एका कट्टर शिवसैनिकाने तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढली होती. पण, या पदयात्रेदरम्यान त्या शिवसैनिकाचे निधन झाले आहे. या शिवसैनिकाच्या घरी जाऊन शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांत्वन केले. तसेच, पीडित कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदतही केली.
उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने रुईकर यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे मूळ गाव असलेल्या बीड शहरात हळहळ व्यक्त केली. तर, राज्यभरातील शिवसैनिकांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.
सुमंत रुईकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. घरातील कमावता गडी गेल्याने त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार गेला. त्यामुळेच, सुमंत यांच्या कुटुंबाला आता शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रुईकर यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी खैरे यांच्याकडून पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. सुमंत रूईकर यांच्या पत्नी ह्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेत नोकरीला आहेत. किर्ती रूईकर यांना तांत्रिक अडचणी बाजूला सारून नोकरीत कायम करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्दही यावेळी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी दिला. तसेच, रुईकर यांच्या कुटुंबाला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनीही घरी जाऊन आर्थिक मदत केली.
तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच मृत्यूसुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती असा 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. 1 डिसेंबरला ते तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक व्हावी आणि शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळावे यासाठी रुईकर चालत जात होते. 31 डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपतीला पोहचण्याचा संकल्प होता. पण, ताप आल्यामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
यापूर्वीही केली होती पायी यात्रासुमंत रुईकरांच्या मृत्युने बीड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमंत रूईकर यांनी यापूर्वी 2019 मध्ये उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरुपती पायी यात्रा केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांचा कौतुक करत सत्कार केला होता.