बीड : जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांपैकी ४१ प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तर १२ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नसल्याची स्थिती आहे. तर २६ प्रकल्प कोरडेच आहेत. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ६६६.३६ मिमी इतके आहे. या वर्षी १ जूनपासून ७ नोव्हेंबरपर्यंत ६३५.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी हे प्रमाण ९५.३४ टक्के आहे.जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम आणि १२६ लघु प्रकल्प आहेत. आॅगस्ट- सप्टेंबरमध्ये अपुऱ्या पावसामुळे चिंतेचे सावट असताना आॅक्टोबरच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असलेतरी पाण्याच्या दृष्टीने मोठा आधार दिला. ३ मध्यम आणि ३८ लघु प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणी साठा आहे. मोठा असलेल्या माजलगाव प्रकल्पात ८९ टक्के तर ११ लघु प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा उपलब्ध झाला आहे. ३ मध्यम आणि ९ लघु प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. तर २ मध्यम आणि ७ लघु प्रकल्पांत २५ ते ५० टक्के पाणी साठा आहे. ३ मध्यम आणि ११ लघु प्रकल्पांमध्ये २५ टक्के पाणीसाठा आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील गावांची तहान भागविणारा मोठा प्रकल्प मांजरा मात्र जोत्याखाली आहे. तसेच २२ लघु प्रकल्पही जोत्याखाली आहेत. ५ मध्यम आणि २१ लघु प्रकल्प कोरडे आहेत. या प्रकल्पांमध्ये ४७६.६२१ दशलक्ष घनमीटर पाणी साठा उपलब्ध आहे. पाणी साठ्याचे हे प्रमाण ५३.४३ दशलक्ष घनमीटर इतके आहे.
बीड जिल्ह्यातील ४१ प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 11:43 PM