बीड : तालुक्यातील जप्ती पारगावजवळील वेअर हाऊसला सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत कापसाच्या गाठी जळाल्या असून, यात जवळपास ५० ते ५५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वेअर हाऊस चालकाकडून व्यक्त केला जात आहे. ही घटना १ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजेदरम्यान घडली. या वेअर हाऊसमध्ये शासनाने व काही खासगी व्यापाऱ्यांनी कापसाच्या गाठी ठेवल्या होत्या.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या मध्यरात्रीपासून कार्यरत आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात गाठी असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. वेअर हाऊसमध्ये वीज नसते. त्यामुळे आग लागण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या जप्ती पारगाव येथील हे गोदाम बुलडाणा अर्बन बँकेने भाड्याने घेतले होते. त्यामध्ये पणन महासंघाच्या २१ हजार १५० व खासगी व्यापारी व जिनिंग यांच्या ५ हजार ५१, अशा मिळून २६ हजार २०१ कापसाच्या गाठी ठेवलेल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्री भीषण आगीत सर्व काही खाक झाले. बुलडाणा अर्बन बँकेसोबत पणन महासंघाचा करार झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथेदेखील याच बँकेचे धान्याचे गोदाम जळून खाक झाले होते. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.