अंबाजोगाई: लग्नकार्यानिमित्त सुवासिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या जेवणातून जवळपास ५० महिलांना विषबाधा झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथे मंगळवारी (दि.०६) घडली. सुदैवाने सर्व बाधित महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
अधिक माहिती अशी की, गीत्ता येथील तरुणाचा येत्या शुक्रवारी विवाह आहे. यानिमित्ताने सोमवारी (दि. ०५) भावकीतील महिलांसाठी सुवासिनींचे जेवण आयोजित करण्यात आले होते. सोमवारी दुपारी गावातील जवळपास शंभर महिलांनी या कार्यक्रमात जेवण केले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातील काही महिलांना विषबाधेची लक्षणे दिसू लागली. दुपारनंतर बाधित महिलांची संख्या वाढल्याने त्यापैकी ३६ महिलांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काही महिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सर्व महिलांची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याची माहिती स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. सध्या स्वाराती रुग्णालयात संध्या दिनेश शिंदे (३५), नीता भागवत शिंदे (४१), अनिता प्रदीप शिंदे (४५), श्रद्धा राजेश शिंदे (३०), सुवर्णा मुरलीधर शिंदे (४०), झुंबर सिद्धलिंग शिंदे (४०), संगीता रामलिंग शिंदे (४०), शीतल श्रीधर शिंदे (४०), सुनिता दशरथ शिंदे (३०), मीनाक्षी मधुकर शिंदे (४५), वर्षा राम शिंदे (४५), रोहिणी परमेश्वर शिंदे (३०), मनीषा गणेश धुमाळ (२९), कविता बाळासाहेब शिंदे (४०), अनिता दिपक शिंदे (४५), जान्हवी राजेश शिंदे (१२), प्रभावती वसंत शिंदे (५२), सुरेखा अरविंद शिंदे (४०), ज्ञानेश्वरी नरसिंग शिंदे (३१), माया संतोष शिंदे (४०), देवकन्या चंद्रकांत शिंदे (४२), मीना पांडुरंग शिंदे (५०), शेषाबाई बाळासाहेब शिंदे (५५), कान्हाबाई शेषेराव शिंदे (६५), मंदोदरी रामराव शिंदे (६०), सुमन विलास शिंदे (५०), अर्चना राजेश शिंदे (४०), सक्षमबाई शाहूराव शिंदे (६०), संगीता विलास शिंदे (४५) अलका सतीश शिंदे (३५), रतनबाई विष्णू शिंदे (६०), स्वाती उमेश शिंदे (२२) आणि काव्या उमेश शिंदे (४०) या महिलांवर उपचार सुरु आहेत.
आ. धनंजय मुंडे यांची तत्परता
घटनेची माहिती मिळताच आ. धनंजय मुंडे यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक खंडू गोरे यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात पाठवून रुग्णांना मदत करण्याबाबत सूचना केल्या. अधिष्ठाता डॉ. खैरे यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सर्व रुग्णांना वार्डात दाखल करेपर्यंत आ. मुंडे दूरध्वनीवरून परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.
सवारातीमधील डॉक्टर आणि कर्मचारी धावले मदतीला
अचानकच मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्यानंतरही स्वाराती रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सर्व रुग्णांना तत्पर सेवा दिली. तातडीने उपचार करून काही रुग्णांना सुटीही देण्यात आली तर काही रुग्णांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. यावेळी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. विनोद वेदपाठक, डॉ. नागेश अब्दागीरे, डॉ. राहुल मुंडे यांच्यासह अपघात विभागातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांनी रुग्णांवर विशेष लक्ष दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"