बीड : तुमचे नेट बँकींग बंद होणार आहे. तुम्हाला लिंक पाठवली आहे त्यावर क्लीक करून ते सुरू करा, असे काॅल करून सांगत बीडमधील डॉ.अनिल भानूदास सानप यांना ५० हजार रूपयाला सायबर भामट्याने गंडा घातला आहे. याची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
१८ मार्च रोजी सकाळीच डॉ.अनिल सानप यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून काॅल आला. समोरच्या अनोळखी व्यक्तीने डॉ.सानप यांना तुमचे नेट बँकिंग बंद होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ.सानप यांना विश्वासात घेत त्याने त्यांना एक लिंक पाठवत ती उघडायला सांगितली. सुशिक्षित असलेल्या डॉक्टरांनीही भूलथापांना बळी पडत ती लिंक ओपन करून माहिती भरली.
यावर त्यांच्या खात्यातून ४४ हजार, ५ हजार आणि १ हजार असे ५० हजार रूपये कपात झाले. पैसे कटल्याचा मेसेज आल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. यावर आता सायबर पोलिस तांत्रिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले.