- सोमनाथ खताळबीड - वडवणी तालुक्यातील कापूस व्यापाऱ्याला मारहाण करून अवघ्या तीन मिनिटांत त्याच्या जवळील ५१ लाख रुपये घेऊन दरोडेखोरांनी धूम ठोकली होती. स्थानिक गुन्हे शाखेने १० दिवस तपास केल्यानंतर टोळीतील म्होरक्यासह सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ४१ लाख रुपये परत मिळविले आहेत. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चालू वर्षातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.
बालाजी महादेव पुरी (वय २१, रा. भवानी माळ, ता. केज), शांतीलाल ऊर्फ गणेश दामोदर मुंडे (वय २१, रा. गोपाळपूर, ता.धारूर), बालाजी रामेश्वर मैंद (वय २०, रा. मैंदवाडी, ता. धारूर), गोविंद ऊर्फ भाऊ नवनाथ नेहरकर (वय ३३, रा. बाराभाई गल्ली, केज) सूर्यकांत लक्ष्मण जाधव (रा. केज) करण विलास हजारे (वय २० रा. केज) अशी पकडलेल्या आरोपींची नावे असून संदीप वायबसे (रा. कासारी, ता. धारूर) हा फरार आहे. ७ फेब्रुवारी रोजी श्यामसुंदर अण्णासाहेब लांडे (रा. घाटसावळी, ता. बीड) हे केजमधील जिनिंगवर कापूस विक्री करून त्याची ५१ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन दुचाकीवरून गावी येत होते. धारूर, चिंचवण मार्गे वडवणीला येत असतानाच त्यांची सोन्नाखोटा परिसरातील डोंगरात दुचाकी अडविण्यात आली. दुचाकीवरील दोन आणि कारमधून आलेल्या तिघांनी लांडे यांना मारहाण करत त्यांच्याजवळील ५१ लाख रुपये घेऊन धूम ठोकली होती. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यावर स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेत दोन पथके रवाना केली. सीसीटीव्ही फुटेज, बातमीदार आणि तांत्रिक तपास करून त्यांनी या टोळीचा पर्दाफाश केला. शिवाय त्यांच्याकडून रोख ४१ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. आता ही सर्व टोळी वडवणी पोलिसांच्या स्वाधीन केली असून फरार आरोपींचाही शोध सुरू असल्याचे अधीक्षक ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संतोष साबळे आदींची उपस्थिती होती.
कारवाई करणाऱ्या टीमला १० हजार रुपयांचे बक्षीसही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीडचे अपर अधीक्षक सचिन पांडकर, अंबाजोगाईच्या चेतना तिडके, माजलगावचे सहायक अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि संजय तुपे, पोउपनि सुशांत सुतळे, हवालदार कैलास ठोंबरे, नसिर शेख, अशोक दुबाले, भागवत शेलार, रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजू पठाण, बप्पा घोडके, अर्जुन यादव, विकी सुरवसे, रवींद्र गोले, देविदास जमदाडे, गणेश हांगे, चालक अतुल हराळे, गणेश मराडे यांनी केलेली आहे. या सर्वांना १० हजार रुपयांचे रिवॉर्डही अधीक्षक ठाकूर यांनी जाहीर केले आहे.
अशी केली पैशांची विभागणीपैसे लुटल्यानंतर हे सर्व जण एकत्र आले. त्यांना अपेक्षापेक्षाही जास्त पैसे मिळाल्याने ते अश्चर्यचकीत झाले होते. त्यांनी ५१ पैकी ३० लाख रुपये नेहरकर, ११ लाख गणेश मुंडे, तर १० लाख रुपये फरार असलेल्या वायबसेकडे ठेवले होते. हे सर्व वातावरण शांत झाल्यानंतर हे पैसे वाटून घेणार होते. परंतु, त्या आधीच पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश केला.
बालाजी दुचाकीचाेर, सूर्यकांत नवीनचयातील बालाजी हा दुचाकीचोर आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी त्याने केजमधूनच चोरी केली होती. तसेच, गुन्ह्यातील कार ही नेहरकर याची होती. तर, सूर्यकांत हा पहिल्यांदाच अशा गुन्ह्यात अडकला आहे. त्याला असा गुन्हा केल्यावर पुढे काय होणार, याचे कसलेही गांभीर्य नव्हते.
सूर्यकांत जिनिंगमध्ये कामगार, त्याने दिली टीपसूर्यकांत हा जिनिंगमध्ये कामगार आहे. त्याची बालाजीसोबत ओळख होती. त्यांनीच बसून हा लुटमारीचा प्लॅन आखला. ठरल्याप्रमाणे लांडे यांनी रोख रक्कम बॅगमध्ये ठेवल्याची टीप सूर्यकांत याने बालाजीला दिली. त्यानंतर सर्व आरोपी एकत्र आले आणि त्यांनी केजपासूनच दुचाकी आणि कारमधून पाठलाग सुरू केला. सोन्नाखोटा परिसरात डोंगर आणि येथे माणसांची वर्दळ नसल्याने दुचाकी आडवी लावून लुटत पुन्हा पसार झाले. हे सर्व लुटारू एकमेकांचे मित्र आहेत.
वायबसे १० लाख घेऊन करतोय ऐश५१ लाखांपैकी १० लाख रुपये फरार असलेल्या वायबसे याच्याकडे आहेत. तो सध्या एका महिलेला घेऊन परराज्यात ऐश करण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्याच्या पाठलागासाठीही लवकरच पथक रवाना केले जाणार आहे. त्याच्याकडील १० लाख रुपये परत मिळवू, असा विश्वास बीड पोलिसांनी व्यक्त केला आहे.