लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील बेलवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान यादीत नाव लावून मतदान केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार सरपंच महिलेसह ५१ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.यावर्षीच्या मे महिन्यात बीड तालुक्यातील बाभुळवाडी, बेडकुचावाडी आणि बेलवाडी या ग्रुप ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी बाभूळवाडीच्या वंदना परमेश्वर सातपुते आणि बेलवाडीच्या अश्विनी दादासाहेब खिंडकर यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत अश्विनी खिंडकर विजयी होऊन सरपंच झाल्या. मात्र, या निवडणुकीपूर्वी पार पडलेल्या २०१६ सालच्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बेलवाडी मधील मतदार संख्या ३९६ होती. मात्र, ग्रुप ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्यात ११३ मतदानाची वाढ होऊन ती ५०९ झाली. याबाबत वंदना सातपुते यांनी आक्षेप घेतला. अश्विनी खिंडकर यांनी पती आणि मुलाच्या सहाय्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान यादीत बेकायदेशीरपणे अनेक नावे घुसडल्याचा आरोप त्यांनी केला. वाढीव नावांच्या आधारे अश्विनी खिंडकर यांनी विजय मिळविला असून बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी त्यांनी अनेक बेकायदेशीर आणि अनैतिक मार्ग अवलंबविण्यात आल्याची फिर्याद वंदना सातपुते यांनी बीड न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश पोलिसांना दिले.सदर आदेशावरून सरपंच अश्विनी खिंडकर यांच्यासह एकूण ५१ जणांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधीत्व कायदा कलमांसह इतर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
सरपंच महिलेसह ५१ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:02 AM
तालुक्यातील बेलवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान यादीत नाव लावून मतदान केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार सरपंच महिलेसह ५१ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
ठळक मुद्देबनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नावे लावली