माजलगाव ( बीड ) : काळ्या बाजारात जाणारा रेशनच्या तांदुळाचे 558 पोते पोलिसांनी आज पहाटे शहरापासून जवळ असलेल्या ब्रम्हगाव येथून जप्त केले. जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली. पंधरा दिवसात कुमावत यांच्या पथकाची ही दुसरी कारवाई आहे. या कारवाईत तांदूळ आणि ट्रक असा एकूण 31 लाख 98 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव शहर व तालुक्यामध्ये राशनचा माल खुलेआम काळयाबाजारात विकला जातो. याकडे पुरवठा विभागाचे जाणुनबुजुन दुर्लक्ष होतांना दिसते. माजलगावात खुल्लेआम राशनचा माल आणून शहराच्या जवळील ब्रम्हगाव येथून विकला जातो, अशी माहिती खबऱ्यामार्फत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमावत यांना मिळाली. यावरून आज पहाटे साडेपाच वाजता पथकाने ब्रम्हगाव येथे धाड टाकली. यावेळी युनुस ईसाक अत्तार याच्या राहत्या घराजवळ असलेल्या पत्राच्या गोडावूनमधून ५५८ पोते तांदूळ अवैधरीत्या साठवून ठेवलेला आढळून आला.
मालाचे वजन वजन 27 हजार 920 किलो असून किमंत 6 लाख 98 हजार रूपये आहे. त्याचबरोबर एका ट्रक देखील पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून युनुस ईसाक अत्तार, हनुमंत भगवान व-हाडे रा. रोशणपुरा ,सतिष शेषेराव वाघमारे रा. च-हाड फाटा यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहेत.