लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्ह्यात एकूण १२९ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यापैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, एकूण १,०५१ जागांपैकी ५७२ जागा जिंकत महिलांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीतील आरक्षणानुसार महिलांसाठी ५२६ जागा राखीव होत्या. परंतु, अधिकच्या ४६ जागा जिंकून आरक्षणाशिवायही आम्ही निवडून येऊ शकतो, हे महिलांनी दाखवून दिले आहे.
माजलगाव तालुक्यातील मोगरा ग्रामपंचायतीमध्ये तर १३ पैकी १० जागांवर महिला निवडून आल्या आहेत. येथे विजयी झालेल्या काही महिलांशी चर्चा केली असता, गावाच्या विकासासाठी काहीतरी करण्याची उमेद त्यांच्या बोलण्यातून दिसत होती.
बीड जिल्ह्यात ५७२ महिला निवडून आल्या असून, सर्वात जास्त म्हणजेच १३३ महिला बीड तालुक्यात तर त्याखालोखाल ८३ महिला केज तालुक्यात निवडून आल्या. या दोन्ही तालुक्यात ग्रामपंचायतींची संख्याही जास्त होती.
एकूण ग्रामपंचायती १२९
विजयी उमेदवार १,०५१
विजयी महिला उमेदवार ५७२
मी जहागीर मोहा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले आहे. मी माझ्या गावातील शैक्षणिक कामाला प्राधान्य देणार असून, महिलांना सक्षम बनविण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार आहे.
- आशाबाई संजय कांदे
ग्रामपंचायत सदस्य, जहागीर मोहा
आज गावातील सर्वांनी मला सेवा करण्याची संधी दिली आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी मी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणेन. मी गाव आदर्श करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
रुक्मीणबाई अभिमान शिंदे
ग्रामपंचायत सदस्य, जहागीर मोहा
मला सर्व जनतेने भरघोस मतदान करून निवडून दिले आहे. मी माझ्या गावात स्वच्छता मोहीम राबवितानाच गावातील वीज व पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शिवकन्या वसुदेव बिलपे
ग्रामपंचायत सदस्य, जहागीर मोहा
गावाच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय बाळगून मी निवडणूक लढवली. मुलभूत सुविधा गावात देण्यासाठी प्राधान्याने काम करणार आहे.
संगिता ईश्वर वाघचौरे
ग्रामपंचायत सदस्य, भोपा, ता. धारूर
भोपा गावाचा सर्वसमावेशक विकास करून शासनाची ग्रामपंचायतीमार्फत राबवली जाणारी प्रत्येक योजना गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सुरेखा अंकुश तिडके
ग्रामपंचायत सदस्य, भोपा, ता. धारूर
तलवाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महिलांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो. गेल्या वीस वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या प्रस्थापितांविरोधात निवडणूक जिंकून आता गावच्या विकासाचे ध्येय समोर ठेवले आहे. गावातील मुलभूत समस्यांसह महिलांच्या प्रश्नावर काम करण्याचे आश्वासन देत निवडणुकीत मतदान मागितले. ही आश्वासने पूर्ण करणार आहे.
प्रतिभा किशोर हात्ते
ग्रामपंचायत सदस्य, तलवाडा.