बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरात ७९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून या महिन्यात ६ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केला असून २३३३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध निर्बंध घालण्यात आलेले आहे. यामध्ये पोलीस प्रशासनाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच मास्क वापरणे, सॅनिटाझर वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासंदर्भात जनजागृती देखील केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ७९ ठिकाणी लावलेल्या नाकाबंदीवर एका महिन्यात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तोंडाला मास्क न लावता सर्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या १११३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ५३ हजार ५० रुपये दंड वसूल केला आहे, तर विनाकारण फिरणारे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करणारे, तसेच परवानगीपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२४० जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून २लाख ६७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, अन्यथा पोलीस प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात याचे सर्व रेकॉर्ड असणार आहे. त्यामुळे चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट, ना हरकत प्रमाणपत्र प्रशासनाकडून मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.