बीड : येथील जिल्हा लोक न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकन्यायालयात बीड जिल्ह्यात ६ हजार ८०५ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, तब्बल १८ कोटी ५५ लाख ९३ हजार २६८ रुपयांची तडजोड करण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड आणि जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे जिल्हा न्यायालयात आयोजन केले होते. प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष हेमंत शं. महाजन यांनी राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवलेली जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा न्या.-१ एक यू.टी. पोळ, कौटुंबिक न्यायालयाच्या न्या. सानिका एस. जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सिद्धार्थ ना. गोडबोले, जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड. एन. एम. कुलकर्णी, मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, पॅनलवरील डॉक्टर, विधीज्ञ, प्राध्यापक, ग्रामपंचायत, बँकांचे अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. लोकन्यायालयात कोविड-१९ च्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा व पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समित्या व गट स्थापन केले होते.
लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक विधिज्ञ डॉक्टर प्राध्यापक जिल्हा माहिती अधिकारी नगरपालिका ग्रामपंचायत बँकांचे अधिकारी पतसंस्था विमा कंपनी अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी व इतर विभागांतील अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक बी. बी. झंवर व सर्व कर्मचाऱ्यांना सहकार्य लाभले.
-------
राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवलेली व निकाली प्रकरणे
प्रलंबित - २४७६२
निकाली - १५४५
दाखल पूर्व - ३४,०४२
निकाली - ५,२६०
एकूण निकाली निघालेली प्रकरणे - ६,८०५
अशी झाली तडजोड
प्रलंबित प्रकरणे- १०, ५५, ५८९७२
दाखल पूर्व प्रकरणे- ८,३४,००२९६
एकूण तडजोड रक्कम १८, ५५, ९३२६८
स्पेशल ड्राइव्हमध्ये चांगला प्रतिसाद
२२,२३,२४ सप्टेंबर रोजी झालेल्या स्पेशल ड्राइव्हमध्ये एकूण २४२४ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २१४१ प्रकरणे निकाली निघाली.
------------