लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोविड-१९ च्या नियमांचे काटेकोर पालन करत नॅशनल इलिजिब्लीटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) १२ सप्टेंबरला जिल्ह्यातील २४ केंद्रांवर शांततेत व सुरळीत पार पडली. सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ६ हजार ८५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १५० विद्यार्थी गैरहजर राहिले.
जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी या ठिकाणी एकूण २४ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या सूचनेनुसार सर्वच केंद्रांवर कोविड-१९ च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे फलक लावले होते. तसेच दक्षता बाळगण्यात आली होती. केंद्रात प्रवेशापासून परीक्षा कालावधी संपेपर्यंत परीक्षेबाबतच्या सूचनांची अंमलबजावणी व पालन प्रभावीपणे झाल्याने परीक्षा सुरळीत पार पडल्या.
प्रश्नपत्रिकांच्या पेटीला जीपीएस डिजीटल लॉक
नीट परीक्षेसाठी २०१९ पासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रश्नपत्रिकांच्या सीलबंद पेट्यांना जीपीएस डिजिटल लॉक होते. बॅँकेतून थेट परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकांची पेटी ठरवून दिलेल्या मार्गावरून पोहोचल्यानंतर केंद्रप्रमुखांनी जिल्हा समन्वयकांना रिपोर्ट केले. दिलेल्या वेळेनुसार रिमोटद्वारे बीप वाजताच जीपीएस लॉक ओपन झाले. त्यानंतर मानवीय पद्धतीने दुसरे कुलूप उघडण्यात आले. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता परीक्षा व्यवस्थेला समजणे सुलभ झाले. उत्तरपत्रिकाही सुरक्षितपणे विमानाने रवाना करण्यात येणार हाेत्या.
केंद्र २४ : केंद्र प्रमुख २४ : नीट प्रतिनिधी २४
एकूण परीक्षार्थी ७०००
अनुपस्थिती १५०
---------
केंद्र सरकारच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी परीक्षा केंद्र संख्येत मागील काही वर्षांपासून वाढ झाली. बीड जिल्ह्यात २४ केंद्रांवर यंदा ही परीक्षा झाली. मात्र, परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना १२० ते २०० किलोमीटर दूरवरून यावे लागले. पुढील वर्षी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच परीक्षा देण्यासाठी व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा अनेक पालकांनी व्यक्त केली.
---------------