केज ( बीड ) : तालुक्यातील साठ हजार शेतकर्यांना बोंडअळीच्या नुकसानी पोटी शासनाने जाहीर केलेली अनुदानाची रक्कम अद्यापही मिळाली नाही. अनुदानाची रक्कम पेरणीसाठी उपयोगी पडेल या आशेवर शेतकरी रक्कमेची प्रतीक्षा करत आहेत.
तालुक्यातील शेतकर्यांनी गेल्या वर्षी च्या खरीप हंगामात नगदी पीक असलेल्या कापसाची लागवड 39 हजार 145 हेक्टर क्षेत्रावर केली होती कापसाच्या पिकाची मशागतीसह कापसावरील कीडीचा प्रतिबंध करण्यासाठी कापसावर औषधांच्या फवारणीही केल्याने कापसाचे पीक बहरात आले कापसाचे पिक बहरात आल्यानंतर कापसाला बोंड लागण्यास सुरवात झाल्यानंतर कापसाच्या बोंडाच्या आत शेंदरी बोंडअळीने हल्ला चढवल्याने शेतकर्यांच्या हातुन कापसाचे पीक गेल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. कापसाचे बोंडअळीने झालेल्या नुकसानीपोटी शासनाने शेतकर्यांना सहा हजार आठशे रुपये प्रमाणे हेक्टरी अनुदान जाहीर केले होते.
चालु वर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी अनुदानाची रक्कम कामी येईल अशी अपेक्षा शेतकर्यांना होती मात्र तालुक्यातील साठ हजार शेतकर्यांच्या बँकेच्या खात्यात अद्यापही शासनाने जाहीर केलेले बोंडअळीचे अनुदान जमा झाले नसल्याने बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम खात्यात केंव्हा जमा होणार याची प्रतिक्षा शेतकरी करत आहेत.
सात कोटीचे अनुदान वाटपतालुक्यातील 39 हजार 145 हेक्टर वरील कापसाच्या पिकांचे बोंडअळीने नुकसान झाले आहे तालुक्यातील 38 गावातील 19 हजार 64 शेतकर्यांच्या बँक खात्यात सात कोटी 9 लाख 82 हजार 933 रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे उर्वरित शेतकर्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी मागणी करण्यात आली असल्याचे नायब तहसीलदार आशा वाघ यांनी दैनिक लोकमतशी बोलताना सांगितले.
दोन हप्ते शिल्लक आहेतपहिल्या हप्त्यातील बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम शेतकर्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात आली आहे बोंडअळीच्या अनुदानाच्या रक्कमेचे दोन हप्ते शिल्लक असल्याचे तहसीलदार अविनाश कांबळे यांनी सांगितले.