बीड : अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारच्या वाट्यातील ६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजुरीनंतर श्रेयाचे दावे करण्यात येत आहेत.
चालू वर्षामधील राज्य सरकारचा हिस्सा तातडीने उपलब्ध करून दिल्यास रेल्वे मार्गाचे कामे सुरू होईल अशा मागणीचे निवेदन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औरंगाबाद भेटीमध्ये दिले होते. त्यामुळे हा निधी मिळाल्याचा दावा करण्यात आला. बीड-नगर-परळी हा २६१.२५ कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग मंजूर होऊन या मार्गाचे काम सुरू झाले आहे. या मार्गासाठी ३ हजार ७१२ कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकार यांचा ५० टक्के सहभाग आहे. आतापर्यंत ६१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच उस्मानाबाद ते बीड ११२ कि.मी. अंतर आहे. त्यात येडशीपर्यंत लोहमार्गाचे काम अस्तित्वात आहे. पुढे ८० कि.मी. साठी राज्य सरकारने ५० टक्के सहभाग घ्यावा अशी विनंती क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दुसरीकडे माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्गासाठी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.