बीड : शहरातील ६४९ व्यापाऱ्यांची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात २९ व्यापारी बाधित आढळले. सोमवारी या मोहिमेचा शेवटचा दिवस असणार आहे. मात्र, असे असले तरी अद्यापही व्यापारी चाचणीसाठी उत्स्फूर्तपणे पुढे आले नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, जिल्ह्यातील सर्वच व्यापारी, दुकानदारांना १५ मार्चपर्यंत कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले होते. त्याप्रमाणे बीड शहरात १० मार्चपासून या मोहिमेला सुरूवात झाली होती. सुरूवातीपासूनच बीडमध्ये या चाचणीला व्यापाऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. रविवारी तर केवळ ६४९ व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली. त्यातील २९ व्यापारी कोरोनाबाधित आढळल्याची माहिती प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या चाचणीच्या अंदाजाने शहरात जवळपास १० हजार व्यापारी आहेत. त्यामुळे तसे नियोजन आरोग्य विभागाने केले होते. परंतु, आतापर्यंत ४ हजारांचा टप्पाही ओलांडला नाही. या मोहिमेचा सोमवारी शेवटचा दिवस असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत मोहिमेची तारीख वाढविण्यात आली नव्हती.