बीड : वडील मृत झाल्यानंतर त्यांच्या खात्यातील ६५ लाखावर मुलाने आईच्या परस्पर डल्ला मारला. त्यासाठी त्याने धनादेशावर वडिलांची चक्क बनावट स्वाक्षरी केली. शहरातील मलिकपुरा भागात हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. त्यानंतर आईने दिवट्या मुलाविरुद्ध शहर ठाण्यात ९ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद केला.
कमर बेगम अब्दुल रौफ (६०, रा. मलिकपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा अब्दुल रहीम अब्दुल रौफ (३७) याने वडील मृत असताना त्यांच्या धनादेशावर बनावट सह्या करून महाराष्ट्र बँकेतील ६५ लाख ९२ हजार रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. ७ सप्टेंबर रोजी ही बाब उजेडात आली. यावर विचारणा केली असता, त्याने आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अब्दुल रहीम अब्दुल रौफ याच्याविरुद्ध शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक हेमंत कदम करीत आहेत.