विजयकुमार गाडेकर/
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुक्यात आतापर्यंत कोरोनाकाळात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ४६ पुरुष, तर २२ महिलांचा समावेश आहे. अनेकजण कुटुंबांचे आधार होते. यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.
कोरोनाने दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाय पसरले होते. यात शिरुर तालुक्यात तब्बल ६८ घरांवर दुखा:चा डोंगर कोसळला. यात ४६ पुरुष व २२ महिलांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या संकटाला सामोरे जाऊन त्याला पराभूत करण्यासाठी शासन, प्रशासन, सेवाभावी संस्थांशिवाय वैयक्तिक सामाजिक कार्यकर्ते या लढ्यात सहभागी होऊन आधार देण्याचे काम करत होते. दुसरी लाट ग्रामीण भागात पसरल्याने दवाखाने, सेंटर कमी पडत होती. ऑक्सिजन तुटवडा जाणवत होता. माणसांची मर सुरू होती. स्मशानभूमीतही अंत्यसंस्काराला नंबर लावण्याची दुर्दैवी वेळ अनुभवली. तसेच काही वेळा सामूहिक स्वरूपात शव स्मशानभूमीत वाहनाने न्यावे लागले, हे विदारक चित्र देखील अनुभवले.
शिरूर कासारसारख्या छोट्याशा तालुक्यात कोरोना उशिरा पोहोचला असला तरी, त्याची दाहकता दाखवून दिली. ५ सप्टेंबर २०२० रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला. या लाटेत नोहेबरपर्यंत १२ मृत्यू झाले, तर तेथून पुढे १८ जूनपर्यंत तब्बल ५२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवाल सांगतो. एकूण ६८ पैकी घरचा आधार समजले जात असलेले ४३, तर चाळीस ते साठ वयापर्यंतच्या १७ लोकांना जीव गमवावा लागला.
.....
नियमांचे पालन करा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेलाही समर्थपणे परतून लावू. मात्र त्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षित अंतर, हात स्वच्छ धुणे, तोंडावर मास्क आणि सॅनिटायझर या पंचसूत्रीचे अनुपालन अनिवार्य आहे. तुम्ही सुरक्षित राहा, दुसरे सुरक्षित राहतील. विनाकारण फिरण्याचा मोह आवरा, असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.