लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ ६९ जणांना मिळाला असून लाभार्थी संख्या वाढविण्यासाठी मोहीम सुरु केल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण यांनी सांगितले.मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना सुरु आहेत. १ आॅगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे अंबाजोगाई तालुक्यात १८, माजलगाव ७, केज १२, परळी २, बीड ७, शिरुर ३, गेवराई २, आष्टी २, धारुर १, वडवणीत ४ लाभार्थी आहेत. तसेच बीड शहर २ व अंबाजोगाई शहरातील ६ लाभार्थी आहेत. लाभार्थी वाढविण्यासाठी १ किंवा २ मुली असणाऱ्या पालकांची यादी करण्याच्या सूचना बालविकास प्रकल्प अधिका-यांना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्या आहेत. संबंधित पालकांचे समुपदेशन करुन योजनेची माहिती दिली जात आहे.लाभ घेण्यासाठी अटीएक किंवा दोन्ही मुलींचा जन्म हा १ आॅगस्ट २०१७ नंतर असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजारापेक्षा कमी असावे, कुटुंबातील माता अथवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी. बालगृहातील १ आॅगस्टनंतर जन्मलेली अनाथ मुलगी.होणारे लाभएका मुलीवर मातेने अथवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असल्यास मातेच्या व मुलीच्या नावे संयुक्त खात्यामध्ये ५० हजार रुपये मुदत ठेव ठेवण्यात येते.दोन मुलीवर मातेने अथवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असल्यास मातेच्या व मुलीच्या नावे संयुक्त खात्यामध्ये २५ हजार रुपये मुदत ठेव ठेवण्यात येते.मुलगी सहा वर्ष किंवा बारा वर्ष वयाची झाल्यास मुदत ठेव ठेवलेल्या रकमेवर व्याजाची रक्कम काढून तिच्या आरोग्य व शिक्षणावर खर्च करता येते.मुलगी १८ वर्षांची झाल्यावर आणि इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तोपर्यंत अविवाहित असल्यास व्याजासह संपूर्ण रक्कम तिच्या भविष्यासाठी तरतूद करता येते.
‘माझी कन्या भाग्यश्री’चे बीड जिल्ह्यात ६९ लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:53 AM