परळी (बीड ) : रेल्वे रुळावर सिमेंट स्लीपर टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे व घातपात करण्याच्या आरोपावरून परळी ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री पाच जणांना तर बुधवारी एकास अटक केली. याप्रकरणी या पूर्वीच एकास अटक करण्यात आली आहे. सातही आरोपींना न्यायालयाने आज एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
परळी, - घाटनांदूर रेल्वे मार्गावरील रुळावर 3 जानेवारी रोजी दुपारी रेल्वेचे सिमेंट स्लीपर आढळून आले होते. या प्रकरणी घातपात करण्याचा संशयावरून 4 जानेवारीस स्वप्नील साळवे यास ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अधिक तपासातून पोलिसांनी मंगळवारी ५ व आज एकास ताब्यात घेतले. आता या प्रकरणी आरोपींची असंख्या ७ झाली असल्याचे परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक शेळके यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, गोविंद राऊत यांच्यासह इतर पोलिसांनी ही कामगिरी केली. अटकेतील आरोपींमध्ये स्वप्नील साळवे, आशिष संमिदरसवळे, हनुमान रोडगे, शिशीकांत क्षीरसागर , अभिजित कांबळे, विशाल डोंगरे, अभिषेक जगतकर या सात जणांचा समावेश आहे. सर्वाना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.