आष्टी : एकत्रिकरणामधील पतीच्या नावावरील ७ एकर क्षेत्र गायब असून, एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन वारसांच्या नावे घेण्यात यावी, अशी मागणी सुजानाबाई उत्तम जरे व उषा चंद्रकांत नांगरे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सुजानाबाई जरे या उत्तम विठोबा जरे यांची पत्नी, तर उषा नांगरे ही मुलगी आहे. त्यांना मौजे मातकुळी येथे जुना सर्व्हे नं. १३२ / अ व नवीन सर्व्हे नं. ८२९मध्ये एकूण ८ एकर १२ गुंठे शेतजमीन आहे. ही शेतजमीन ते अद्यापपर्यंत वहिवाट करीत असून, त्यातील पिकांचा उपभोग घेत आहेत. या जमिनीचे मूळ मालक अर्जदार जरे यांचे सावत्र चुलत सासरे रंगनाथ जरे हे अर्जदार नांगरे यांचे आजोबा होते. त्यांना कोणीही अपत्य नसल्यामुळे ते मयत झाल्यानंतर वरील सर्व जमीन आमच्या ताब्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. १९९०मध्ये जमीन एकत्रिकरणामध्ये ताब्यातील ८ एकर १२ गुंठे जमिनीपैकी अर्जदाराचा मुलगा देविदास उत्तम जरे यांच्या नावे २३ आर. जमीन व माझी सून संगीता देविदास जरे हिच्या नावे २० आर. जमीन आलेली आहे. तसेच उर्वरित जमीन ही भावकीतील दिलीप महादेव जरे, नवनाथ महादेव जरे, सतीश सदाशिव जरे, गणेश सदाशिव जरे, धनंजय सदाशिव जरे यांच्या नावे ४ एकर जमीन आणि अनिल विठोबा जरे, भीमराव विठोबा जरे व शामराव विठोबा जरे यांचा मुलगा रंगनाथ उर्फ प्रकाश शामराव जरे यांच्या नावे ३ एकर जमीन एकत्रिकरणामध्ये गेली आहे. परंतु या जमिनीवर अद्यापपर्यंत आपला ताबा असून, वहिती करून खात असल्याचे सुजानाबाई जरे व उषा नांगरे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच फेर नं. १८४२ अन्वये सर्व्हे नं. ८२९मध्ये चुकीने विहिरीची नोंद झाली होती ती विहीर ८३१मध्ये होती. हा फेरफार रद्द करण्याबाबत उपविभागीय अधिकारी, पाटोदा यांच्याकडे अपील दाखल केलेले असून, अपिलाची कारवाई सुरू आहे. एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन आपल्या नावे करावी म्हणून जरे व नांगरे यांनी वेळोवेळी आष्टी तहसील कार्यालय, मंडल अधिकारी व जिल्हाधिऱ्यांकडे अर्ज केलेले आहेत. परंतु त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे एकत्रिकरणामध्ये गेलेली आमची जमीन वारसांच्या नावे घेण्याची मागणी निवेदनात केली आहे. मात्र, सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव अर्जदारांना येत आहे.