बीड : बीडमधील प्रेमप्रकरणातून झालेल्या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य दोन आरोपींसह कट रचणाऱ्या एकाला अटक करुन बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी या तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
१९ डिसेंबर रोजी तेलगाव नाक्यावर सुमित वाघमारे या युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. यात बालाजी लांडगे, संकेत वाघ या दोन मुख्य आरोपींसह कृष्णा व गजानन रवींद्र क्षीरसागर या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. कृष्णाला दोन दिवसांपूर्वीच अटक झाली असून, त्याला पाच दिवसांची कोठडी दिली आहे. मंगळवारी बालाजी, संकेत व गजानन यांना अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या खूनाचा तपास पेठ बीड ठाण्याचे स. पो. नि. पंकज उदावंत हे करीत आहेत.
न्यायालयात तगडा बंदोबस्तप्रकरण संवेदनशील असल्याने आरोपींना न्यायालयात हजर करतेवेळी बीड पोलिसांनी न्यायालय व परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, शिवाजीनगर ठाण्याचे पो. नि. शिवलाल पुर्भे, पो. उप नि. कैलास लहाने, बी. एस. ढगारे यांच्यासह आरसीपीचे जवान तैनात होते. बंदोबस्तातच त्यांना आत व बाहेर काढण्यात आले.
या मुद्द्यांसाठी मागितली पोलीस कोठडीगुन्ह्यात वापरलेले वाहन, हत्यार जप्त करणे बाकी आहे. तसेच या चार आरोपींनी सहा दिवस कोठे पलायन केले ? त्यांना सहकार्य कोणी केले ? या प्रकरणात आणखी कोणाचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहभाग आहे का ? आरोपींना वाहन कोणी दिले ? गुन्ह्यातील वाहने कोणाची आहेत ? गुन्ह्यात वापरलेले सीमकार्ड जप्त करणे बाकी आहेत. त्यांनी कोणाकोणाला संपर्क केला ? यासारख्या विविध मुद्द्यांची माहिती जमा करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी १२ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकार पक्षातर्फे विधिज्ञांनी बाजू मांडली. तसेच आरोपीच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. सह दिवाणी कनिष्ठ स्तर न्या. आर. एस. बोंदरे यांनी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.