लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांच्या तपासातून पोलिसांनी हस्तगत केलेले ७ लाख ९२ हजार ४५१ रुपयांचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू अकरा फिर्यादींना गुरुवारी एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते समारंभपूर्वक परत करण्यात आल्या.
मागील काही महिन्यांत घडलेल्या चोरी, दरोडे, जबरी चोरी, घरफोडीच्या ११ गुन्ह्यांचा तपास पोलीस यंत्रणेने केला. यात गुन्हेगारांना शोधून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे क्राईम मोहरील, प्रभारी अधिकाऱ्यांकडे पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी तपासाला गती देण्याबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार २६९. ६१ गॅ्रम सोन व ५ हजार ग्रॅम चांदी असा मुद्देमाल यंत्रणेने गुन्हेगारांकडून हस्तगत केला होता. हा मुद्देमाल ३१ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठक हॉलमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात संबंधित ११ फिर्यादींना वाटप करण्यात आला.
यावेळी फिर्यादींपैकी एक मधुकर शेळके यांनी चोरीस गेलेले सोने पोलिसांनी शोध लावून सन्मानाने परत केल्याबद्दल पोलिसांप्रती आदर निर्माण झाल्याचे मनोगत व्यक्त केले. या वेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, नानासाहेब लाकाळ, दिंद्रूडचे सपोनि पुंडगे, चाटे, डी. जी. तेजनकर आदींसह पत्रकार, नागरिक उपस्थित होते.
८ महिन्यात ३२ लाखांचा माल परत२५ सप्टेंबर २०१७ ते ३१ मे २०१८ या कालावधीत ७७ गुन्ह्यातील १४३५.४७ ग्रॅम सोने- चांदीचे दागिने असा एकूण ३२ लाख ८४ हजार ३८३ रुपयांचा हस्तगत केलेला मुद्देमाल ७७ फिर्यादींना सन्मानपुर्वक परत करण्यात आला.