वडवणी : यावर्षी १ ऑगस्ट २०२१ रोजीपासून शेतकऱ्यांना सुधारित ७/१२ डिजिटल स्वाक्षरी फेरफार नोंदवही नक्कलदेखील ऑनलाईन महाभूमी पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र शासनाचा विचार आहे. त्यादृष्टीने वडवणी तहसील प्रशासनाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी तालुक्यातील ७/१२ संगणकीकरणाची मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. जवळपास ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झालेले आहे. तसेच खरीप हंगाम २०२१साठी तालुक्यातील पीक कर्ज वाटपाचे ५५ टक्के उद्दिष्टही आजपर्यंत साध्य करण्यात आले आहे, अशी माहिती वडवणीचे तहसीलदार प्रकाश सिरसेवाड यांनी दिली आहे.
महसूल दिनाचे औचित्य साधत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे ७/१२ संगणकीकरण, ओडीसी अहवाल, विसंगत ७/१२ दुरुस्ती करणे, गट जुळविणे, डीएसडी अहवाल निरंक करणे, एमएलआरसी सेक्शन १५५ अंतर्गत तहसीलदार यांचे स्तरावरील प्रलंबित आदेश निर्गमित करणे, डीएसडी फेरफार रजिस्टर, पीक कर्ज वाटप इत्यादी सर्व कामे वडवणी तहसील प्रशासनाच्या वतीने सप्ताहातील सातही दिवस विशेषतः शनिवार व रविवार या दिवशीसुध्दा करण्यात येत आहेत.
तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, मंडल अधिकारी व तलाठी हे तत्परतेने काम करत आहेत. यामध्ये विसंगत ७/१२च्या एकूण १०२९ प्रकरणांपैकी ७०५ प्रकरणे निकाली निघाली असून, आता ३२४ प्रकरणे शिल्लक आहेत. क्षेत्र दुरुस्तीमधील एकूण १७० प्रकरणांपैकी २८ प्रकरणे निकाली निघाली असून, १४२ प्रकरणे शिल्लक आहेत. डीएसडी फेरफार रजिस्टर १०० टक्के पूर्ण झाले असून, यामध्ये एकूण १८ हजार ४५६ नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. तसेच वडवणी तालुक्यातील सर्व बँकांकडून खरीप हंगाम २०२१साठी पीक कर्ज वाटपाच्या एकूण उद्दिष्टापैकी ५५ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले असून, यामध्ये उद्दिष्टीत असलेली शेतीपीक कर्ज वाटपाची एकूण रक्कम ५६ कोटी ७१ लाख ५८ हजार रुपयांपैकी ३० कोटी ६६ लाख ५९ हजार रुपये एवढी रक्कम पीक कर्जापोटी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली आहे.
अशा प्रकारे वडवणी तहसील प्रशासनाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी तालुक्यातील ७/१२ संगणकीकरण मोहीम ही अंतिम टप्प्यात आली असून, जवळपास ९० टक्क्यांच्यावर काम पूर्ण झालेले आहे. तसेच खरीप हंगाम २०२१साठी तालुक्यातील पीककर्ज वाटपाचे ५५ टक्के उद्दिष्टही आजपर्यंत साध्य करण्यात आले आहे. अशी माहिती वडवणीचे तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, नायब तहसीलदार रवींद्र शहाणे, मंडल अधिकारी सुभाष चुनोडे यांनी दिली आहे
270721\947-img-20210727-wa0000.jpg
तालुक्यातील ७/१२ संगणकीकरण करताना महसूल कर्मचारी