बीड : तालुक्यातील वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना मटकीतून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. सर्व विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अन्न व औषध प्रशासनाने शाळेला तत्काळ भेट देऊन नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. वांगी येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनाही गुरुवारी दुपारी १२ वाजता मटकी देण्यात आली. मटकी खाताच काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागले, तर काहींना मळमळ होऊ लागली. हा प्रकार शिक्षकांना समजताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ सर्व डॉक्टर व कर्मचारी एकत्र करीत मुलांवर उपचार सुरु केले. काहींना अपघात विभागात, तर काहींना वार्ड क्रमांक ९ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा प्रकार समजताच जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. तोपर्यंत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत वांगी येथील जि. प. शाळेत धाव घेतली. तेथील मटकी व इतर धान्याचे त्यांनी नमुने तपासणीसाठी घेतल्याचे सांगण्यात आले.
ज्या मुलांना विषबाधा झाली नव्हती परंतु खरबदारी म्हणून त्यांनाही रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्याही तपासणी केल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.
मुलांना मटकीचा आहार देण्यात आला होता. आम्ही नियमित तपासणी करतो. परंतु हा प्रकार कसा घडला हे समजलेच नाही. काही मुलांच्या पोटात दुखू लागल्याचे समजातच सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.- एस. एस. तिडके, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, वांगी