बीड : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट भयानक राहिली आहे. असे असले तरी दिलासा देणारे म्हणजे जिल्ह्यातील तब्बल ७५९ गावे कोरोनामुक्त आहेत. कोरोनामुक्त गावांची संख्या मोठी असली तरी अद्यापही जिल्ह्यात १४ गावे हॉटस्पॉट असून, या ठिकाणी पाच जास्त कोरोनाबाधित रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे काळजी घेण्यासह काेरोना नियमांचे पालन अन् प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा बुधवारीच ओलांडला आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे. दररोज १०० ते १५० पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत, तर किमान पाच रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशातही काही ग्रामस्थांनी आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यात बाजी मारली आहे. कोरोना नियम आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोरोनाला वेशीच्या बाहेरच ठेवले आहे. ही बाब सर्वांसाठी समाधान देणारी आहे. आरोग्य विभागानेही या गावांचे कौतूक केले असून, इतरांनीही आपली गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठी काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, काेरोनामुक्त गावांची संख्या समाधान देणारी असली, तरी १४ गावांमध्ये अद्यापही पाचपेक्षा जास्त रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. ही गावे हॉटस्पॉट म्हणून आराेग्य विभागाने घोषित केली आहेत. या गावांवर विशेष लक्ष ठेवून कंटेन्मेंट झोनही करण्यात आला आहे. परंतु, केवळ प्रशासनाने करून उपयोग नसून ग्रामस्थांनीही याला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही गावे आहेत हॉटस्पॉट
बेळगाव १३, कडा १५, पाटोदा ८, एकूर्का ८, सुलेमान देवळा १२, चोभानिमगाव ५, जामगाव ५, कासारी ५, लोणीघाट ५, मुगगाव ९, गेवराई ५, अंतापूर ५, कुंबेफळ ६, चंदनसावरगाव ७ ही गावे सध्या हॉटस्पॉट आहेत. येथे आरोग्य विभागाचे विशेष लक्ष आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ७५९ गावे कोरोनामुक्त आहेत. या गावांचे खरोखरच कौतुक करावे. परंतु, ५ पेक्षा जास्त ॲक्टिव्ह रुग्ण असलेली १४ गावे अजूनही हॉटस्पॉट आहेत. त्या गावांनीही इतरांसारखी काळजी घ्यावी. आमचेही यावर विशेष लक्ष आहे. प्रशासनाच्या सूचना आणि कोरोना नियमांचे पालन करावे.
डॉ. रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
180821\18_2_bed_16_18082021_14.jpeg
डॉ.रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड