माजलगाव : बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वरचेवर वाढतच असून माजलगाव येथे रविवारी तब्बल 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे जनतेत घबराट निर्माण झाली आहे.
कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगाने होत आहे. रोज होणाऱ्या तपासणीमध्ये दररोज 50-70 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणाऱ्या येथील शासकीय कोविड सेंटर व दोन हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाले असून किमान चारशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातच रविवारी सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल 8 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर संध्याकाळी सहा वाजता एका रूग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक गणेश डोंगरे व पथक प्रमुख संतोष घाडगे यांनी दिली. मृत कोरोना रुग्णांवर मंगलनाथ स्मशानभूमीत नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, या घटनेने जनतेत दहशत पसरून घबराट निर्माण झाली आहे. माजलगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने कामाशिवाय कोणीही बाहेर पडु नये असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील , पोलीस निरीक्षक धनंजय फराटे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.