बीड : येथील नगर पालिकेच्यावतीने शहरातील चार प्रभागात वर्षापूर्वी ८० लाख रूपये खर्च करून एलईडी दिवे बसविण्यात आले. मात्र, हे दिवे हलक्या प्रतीचे वापरल्याने केवळ सहा महिन्यातच बंद पडले. त्यामुळे या भागात आजही अंधार आहे. विद्युत विभागाच्या अधिका-यांनी गुत्तेदारांशी भागीदारी करुन कमी खर्चाची एलईडी बसवून निधी हडपल्याची चर्चा पालिकेत ऐकावयास मिळत आहे.
बीड पालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. यावेळी विद्युत विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. साधारण वर्षापूर्वी बीड शहरातील प्रभाग क्रमांक १, ५, ११ व १२ मध्ये ८० लाख रुपये खर्चून प्रत्येक खांबावर एलईडी दिवे बसविण्यात आले. सहा महिने या भागातील रहिवाशांना उजेड मिळाला. मात्र, त्यानंतर एकेक करुन जवळपास ५० टक्के एलईडी दिवे बंद पडलेले आहेत. विशेष म्हणजे विभागातील गलथान कारभाराची कबुलीही येथील एका अधिका-याने दिली.
नागरिक तक्रार घेऊन आल्यानंतर येथील अधिकारी - कर्मचारी मनमानी करतात. वेळेवर तक्रारींचे निराकरण करीत नाहीत. त्यांचे हे दुर्लक्ष सर्वसामान्यांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचे मात्र या अधिकाºयांना कसलेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.अधिका-यांचे एकाच ठिकाणी बस्तानयेथील अधिकारी - कर्मचारी वर्षानुवर्षे याच नगरपालिकेत ठाण मांडून आहेत. बदली आदेश आल्यानंतरही या ना त्या कारणाने ती नाकारतात. तसेच राजकारण्यांना हाताशी धरुन वरिष्ठांवर दबाव आणण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत.त्यामुळे या कामचुकार अधिकारी - कर्मचा-यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून केली जात आहे.