बीड : एटीएम कार्ड ग्राहकाजवळ असताना आणि पासवर्ड कोणालाही दिला नसताना एका व्यक्तीचे ८० हजार भामट्यांनी पश्चिम बंगाल मधील एटीएम मधून काढून घेतले. रविवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी प्रविण शालीग्राम चोपडे यांच्यासोबत ही फसवणूक झाली. रविवारी रात्री ते झोपले असताना त्यांच्या मोबाईलवर दोन कॉल आले. परंतु झोपेत असल्याने त्यांनी कॉल घेतले नाहीत. मध्येच जाग आल्यानंतर मिस्ड कॉल दिसल्याने त्यांनी त्या नंबरवर कॉल लावला. हिंदीत बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीने त्यांना नाव विचारले. परंतु फसवणुकीची शंका आल्याने चोपडे यांनी त्याला खोटे नाव सांगितले आणि लागलीच फोन बंद केला. त्यानंतर एटीएम कार्ड सोबत असल्याची खात्री केली. त्यांनी त्याचा पासवर्ड किंवा पिन कोणाशीच शेअर केला नाही. तरी देखील थोडावेळाने त्यांना त्यांच्या खात्यातून दोन वेळेस ४० हजाराची रक्कम वजा झाल्याचे मेसेज आले.
त्यामुळे त्यांनी तातडीने बँकेच्या कॉल सेंटरला सांगून कार्ड ब्लॉक केले. नेट बँकिंग वापरून त्यांनी खाते तपासले असता पश्चिम बंगाल मधील माल्डा मेडिकल कॉलेजच्या एटीएम मधून त्यांच्या खात्यातून एकूण ८० हजार रुपये काढल्याचे लक्षात आले. याप्रकरणी प्रवीण चोपडे यांच्या तक्रारीवरून बीड शहर पोलिसात अज्ञात भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कार्ड, पासवर्ड शिवाय एटीएम मधील रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटनेने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.