बीड : शहरात धोकादायक इमारतींची संख्या १२२ असून त्यात जवळपास ८०० लोक राहत असल्याचे समोर आले आहे. बीड पालिकेने मान्सून सुरू होण्यापूर्वी सर्वेक्षण केले असता हा प्रकार समोर आला आहे. या सर्वांना नोटीस दिल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी पाऊस, वादळात या इमारतींना धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे गरजेचे आहे.
बीड शहरात प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. बांधकाम विभाग आणि स्वच्छता विभागाकडून पाहणी करून धोकादायक इमारती असलेल्या लोकांना नोटीस बजावली जाते. बीड शहरात सर्वात जास्त अशा इमारतींची संख्या ही पेठबीड भागात असल्याचे पालिका सर्वेक्षणातून समोर आले आहे. गतवर्षी १२६ संख्या होती. त्यातील चौघांनी स्वत:हून इमारती पाडल्याचे पालिकेने सांगितले. असे असले तरी अद्यापही १२२ इमारती उभ्या असून, त्यात रहिवासी वास्तव्य करत आहेत. जास्त पाऊस, वादळ झाल्यास इमारतींना धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वता:हून सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे आवश्यक आहे, अन्यथा जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्याची गरज आहे. पालिकेने मात्र, नोटीस देऊन जबाबदारी झटकली आहे.
स्थलांतर करायचेय; पण कोठे?
ज्या इमारती धोकादायक आहेत, त्यातील लोकांनी स्थलांतर करायचे ठरवले तरी कोठे राहायचे? असा प्रश्न आहे. प्रशासन अथवा नगरपालिकेने त्यांच्यासाठी कसलीही व्यवस्था केलेली नाही. दुसरी बाजू म्हणजे या लोकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने नवे घर बांधू शकत नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी किरायाने जाऊ शकत नाहीत. हे लोक पुढे येऊन बोलण्यास नकार देत आहेत. असे असले तरी त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
प्रत्येक वर्षी नोटीसचा पाहुणचार
बीड नगरपालिकेकडून प्रत्येक वर्षी पावसाळा आला की, या लोकांना नोटीस पाठविली जाते. सुदैवाने आतापर्यंत तरी दुर्घटना घडलेली नाही. त्यामुळे समाधान आहे. पालिकाही केवळ नोटीस देऊन बघ्याची भूमिका घेते; परंतु यावर ठोस उपाययोजना अथवा कारवाई करत नसल्याचे दिसत आहे.
--
गतवर्षी १२६ इमारती धोकादायक होत्या. चौघांनी पाडल्या असून आता ही संख्या १२२ वर आली आहे. यात जवळपास ८०० लोक वास्तव्यास आहेत. त्यांना याबाबत नोटीसही दिली आहे. इमारत पाडण्यासह सुरक्षिततेची जबाबदारी ही त्यांचीच आहे.
डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी न. प. बीड
---
बीड शहरातील धोकादायक इमारती १२२
वास्तव्य करणारे रहिवासी ८००
===Photopath===
090621\09_2_bed_5_09062021_14.jpeg
===Caption===
बीड शहरात अशाप्रकारे इमारती असून त्यात लोक वास्तव्यास आहेत. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाल्यास दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. यात काळजी घेण्याची गरज आहे.