सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यातील राज्याच्या तुलनेत माता मृत्यूचे प्रमाण कमी असले, तरी मागील सात वर्षांत तब्बल ८५ मातांचा जीव गेला आहे. यात २० ते २५ वयोगटांतील मातांचा सर्वाधिक समावेश आहे. उच्च रक्तदाब आणि प्रसूतीवेळी होत असलेल्या रक्तस्त्रावामुळे मृत्यू होत असल्याचे उघड झाले आहे. गरोदर असताना १६ तर प्रसूती झाल्यानंतरही ६५ मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मृत्यू राेखण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी त्यात पूर्णपणे यश आलेले नाही.
महिला गर्भवती असल्यापासून ते प्रसूतीनंतर ४२ दिवसांपर्यंत मृत्यू झाला, तर त्याची माता मृत्यू म्हणून नोंद होते. मातेचा मृत्यू होताच, तत्काळ माता मृत्यू अन्वेषन समितीपुढे हे प्रकरण आणले जाते. संबंधित मातेवर काय उपचार झाले आणि मृत्यूचे नेमके कारण काय, हे शोधण्याचे काम ही समिती करते. कारण शोधण्यासह भविष्यात पुन्हा त्याच कारणांनी माता मृत्यू होऊ नये, यासाठी ही समिती उपाययोजना सुचविते. असे असले, तरी अद्यापही बीड जिल्ह्यातील माता मृत्यू १०० टक्के रोखण्यात आरोग्य विभागाला यश आलेले नाही. हे मृत्यू राेखण्यासाठी जनजागृती, उपाययोजना, अन्वेषण, तपासणी, उपचार केले जात आहेत. मातांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासह आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
कोण असते समितीत अन् काय करते
माता मृत्यू अन्वेषण समितीचे अध्यक्ष हे जिल्हा शल्य चिकित्सक असतात. या समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बालसंगोपन अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख, जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग संघटनेचे पदाधिकारी यांचा समावेश असतो. माता गर्भवती असण्यापासून ते मृत्यूपर्यंत ज्यांनी-ज्यांनी काळजी आणि उपचार केले, त्या सर्वांना समितीसमोर बोलावले जाते. यातून कारणे शोधून उपाययोजना केल्या जातात.
सुरक्षित मातृत्व अभियानाचा फायदा
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला आरोग्य संस्थेत गर्भवतींची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी केली जाते. येथे हाय रिस्क माता शोधून त्यांच्यावर निदान करणे शक्य होेत आहे. हे अभियान बीडमध्ये प्रभावी राबविले जात आहे.
प्रसूतीवेळी होतोय रक्तस्त्राव
सात वर्षांतील सर्वाधिक २१ मृत्यू हे प्रसूतीवेळी रक्तस्त्राव झाल्याने झाले आहेत. रक्त गोठण्याचे प्रमाण वाढल्याने १७ तर उच्च रक्तदाबामुळे १६ मृत्यू झाले आहेत, इतर कारणांमुळे ३१ मृत्यूची नोंद झाली आहे.
कोट - फोटो
गरोदरपणापासून ते प्रसूतीनंतर ४२ दिवसांच्या कालावधीत मृत्यू झाल्यास तो माता मृत्यू असतो. मृत्यूचे कारण शोधून उपाययोजना करण्यासाठी माता मृत्यू अन्वेषण समिती आहे. राज्याच्या तुलनेत बीडचा मृत्युदर कमी आहे. तो शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
डॉ.संजय कदम
माता व बालसंगोपन अधिकारी बीड
------
वयोगटांनुसार मृत्यू
० ते २० - ७
२० ते २५ - ५७
२५ ते३० - १४
३० पेक्षा जास्त - ७
---
मृत्यूचे ठिकाण
जिल्हा रुग्णालय - २७
स्वाराती अंबाजोेगाई - १५
घरी - ७
रस्त्यांत - ४
इतर - ३२
-------
कसे झाले मृत्यू
गर्भवती १६
प्रसूतीवेळी ४
प्रसूतीनंतर ६५
-----
प्रसूती प्रकार
नॉर्मल ५६
सिझर २९
----
प्रसूतीची खेप
१ ली ४०
२ री २२
३ री १४
त्यापुढील ९
---
मृत्यूची कारणे
उच्च रक्तदाब १६
रक्तस्त्राव २१
इक्त गोठण्याचे प्रमाण वाढणे १७
इतर ३१
---
शिक्षण
प्राथमिक २७
माध्यमिक ३८
अशिक्षित २०
----
वर्षनिहाय मृृत्यू
२०१४-१५ = २२
२०१५-१६ = १०
२०१६-१७ = १३
१०१७-१८ = १०
२०१८-१९ = ७
२०१९-२० = ११
२०२०-२१ = १२
एकूण - ८५