बीड : माजलगाव तालुक्यातील केसापुरी कॅम्प परिसरातील पालावर राहणारी लंकाबाई राजेभाऊ खरात (३८) ही महिला १६ मुलांना जन्म दिल्यानंतर १७ व्या वेळी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. ही माहिती मिळताच आरोग्य विभाग पालावर पोहोचला आणि सदरील महिलेला संस्थेत आणून उपचार केले. या महिलेला आतापर्यंत ९ मुली, २ मुले अशी अपत्ये असून पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.
खरात कुटूंब हे मुळचे टाकरवण येथील रहिवाशी आहे. मात्र, रोजगाराचे साधन नसल्याने ते केसापूरी कॅम्प येथे पाल ठोकून राहतात. राजेभाऊ हे गायन करतात तर लंकाबाई भंगार वेचतात. लंकाबाई या सतराव्या वेळी पुन्हा गरोदर आहेत. ही माहिती मिळताच माजलगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन रूद्रवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय पारगावकर, एएनएम साळवे, माळकरी, मुळाटे, पवार यांनी सकाळीच तेथे भेट दिली. यावेळी महिलेला रूग्णवाहिकेतून माजलगाव ग्रामीण रूग्णालयात आणले. तेथे सर्व तपासण्या करण्यात आल्या. यात लंकाबाई २८ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समजले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रियंका राजेभोसले यांनी लंकाबाईची तपासणी केली.
कुपोषित मुलासह ठोकली होती धूम
साधारण दोन वर्षापूर्वी लंकाबाई यांचा मुलगा कुपोषित असल्याचे समोर आले होते. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, कुणालाही कल्पना न देता त्यांनी धूम ठोकली होती. त्यानंतर २४ तासांनी या महिलेला शोधून आणत कुपोषित मुलावर उपचार केले होते. त्यावेळी आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ झाली होती.
महिलेची प्रकृती ठणठणीत आहे
सदर महिलेचे समुपदेशन करून तिला ग्रामीण रुग्णालयात आणले. सर्व तपासण्या केल्यानंतर २८ आठवड्यांचा गर्भ असल्याचे दिसले. स्त्री रोग तज्ज्ञांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. सध्या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे. तिला गर्भवती असताना घ्यावयाची काळजी आणि प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत तसेच काळजीबाबत मार्गदर्शन केले आहे.
- डॉ.अनिल परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी माजलगाव