माजलगाव (बीड ) : निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या इंडियन ऑइलच्या एका पेट्रोल पंपामधून ७ लाख रुपयाचे तब्बल ९ हजार लिटर डिझेल चोरट्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ५ ) घडली असून ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
राष्ट्रीय महामार्गावर पवारवाडी फाट्याजवळ इंडियन ऑइल या कंपनीच्या पेट्रोल पंप उभारणीचे काम सुरु आहे. येत्या दसऱ्याला या पंपाचे उद्घाटन होणार होते. यामुळे येथे अंडरग्राउंड टॅंकमध्ये १२ हजार लिटर डिझेल आणण्यात आले होते. शुक्रवारी पंपाचे मालक किशोर उनवणे पंप बंद करून घरी गेले. यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी टॅंकचे कुलूप तोडून त्यात पाईप टाकत मोटरीद्वारे डिझेलची चोरी केली.
शनिवारी (दि.६ ) सकाळी उनवणे यांना टॅंकचे लोक तुटलेले आढळून आले. तसेच पंपाच्या मागील बाजूस पाईप सापडला. उनवणे यांनी डिझेल टॅंक तपासला असता १२ हजार लिटर पैकी ९ हजार लिटर डिझेल चोरीस गेल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसात हा प्रकार सांगितला मात्र येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी नसल्याने आज गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.