बीड : परळी तालुक्यातील पांगरी साखर कारखान्यात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान उसाच्या रसाची टाकी फुटल्याने ९ जण गंभीर भाजले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या आहेत. कारखान्यात आज नेहमीप्रमाणे काम सुरू होते. याच दरम्यान दुपारी ३ च्या सुमारास अचानक उसाच्या रसाच्या टाकी फुटली. यामुळे टाकीच्या खालच्या भागातून मोठ्या प्रमाणात उकळता रस बाहेर फेकला गेला. या टाकीत नेहमी १२० डिग्री सेल्सिअस तापमानावर उकळता रस असतो. हा रस अंगावर पडल्याने येथे काम करणारे तंत्रज्ञ आणि कामगार असे ९ जण गंभीररित्या भाजले आहेत. घटनेनंतर जखमींना तातडीने परळी आणि अंबाजोगाई येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले.