- सोमनाथ खताळ
बीड : क्षय रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करीत त्यांना १०० टक्के बरे करण्यात बीडच्याआरोग्य विभागाला यश आले आहे. मागील सहा वर्षांत जिल्ह्यात ११ हजार ९५२ रुग्ण आढळले असून, पैकी ९ हजार ६२२ रुग्णांना क्षयमुक्त करण्यात यश आले आहे. महाराष्ट्रात गडचिरोली, यवतमाळनंतर बीड जिल्ह्याचा तिसरा क्रमांक येतो.
२०२५ पर्यंत महाराष्ट्र क्षयमुक्त करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग पाऊले उचलत आहे. एखाद्या रुग्णालया दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला किंवा तपा असेल तर त्यांच्या थुंकीचे नमूने तपासणीसाठी पाठविले जातात. अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांची तात्काळ क्षयरोग विभागात नोंद करून कार्ड दिले जाते. सहा ते आठ महिने त्यांच्यावर उपचार केले जातात. अंतीम अहवालानंतर त्यांना निगेटिव्ह घोषित केले जाते. दरम्यानच्या काळात त्यांना प्रतिमहिना आहारासाठी ५०० रूपये अनुदानही दिले जाते.
दरम्यान, मागील सहा वर्षांत बीडच्या क्षयरोग कार्यालयाने हे रुग्ण बरे करण्यात मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. शोधलेल्या रुग्णांपैकी २०१९ या वर्षांती रुग्ण अद्यापही उपचारावर असून ते ठणठणीत झाल्यावर हा आकडा आणखी वाढणार आहे. यशाची सरासरी टक्केवारी ही ८० च्या पुढे असल्याचे समोर आले आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची टिम परिश्रम घेत आहेत.
आशांमार्फत रुग्णांचा आढावाएखादा रुग्ण टी.बी.पॉझिटीव्ह आढळला की, त्याची संपूर्ण जबाबदारी आरोग्य विभाग घेते. सदरील रुग्ण उपचार घेत आहे का, नियमित औषधे घेतो का, त्याला काही कमी आहे का, याची सर्व माहिती आशांमार्फत संकलीत केली जाते. थोडीही अडचण जाणवली की त्यांना तात्काळ आरोग्य संस्थेत दाखल केले जाते.
खाजगी डॉक्टरांनाही माहिती देणे बंधनकारकपूर्वी खाजगी रुग्णालयात तपासणी केल्यावर रुग्ण पॉझिटिव्ह आढळला तरी ते डॉक्टर माहिती देत नव्हते; परंतु आता सर्वांनाच बंधनकारक करण्यात आले आहे. ‘जीत’ ही संस्था दुवा म्हणून काम करीत आहे, तर डॉ. ज्ञानेश्वर निपटे, डॉ. मनीषा काळे हे पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करतात. प्रत्येक तालुक्यात नियोजनासाठी एक कर्मचारी नियुक्त असून लॅबवाल्यांवरही नजर ठेवली जात आहे. रुग्णांचा शोध घेण्याबरोबरच त्यांना १०० टक्के बरे करण्यात यश येत आहे.
राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडचे काम चांगले असले तरी ते आणखी सुधारण्यासाठी माझ्यासह सर्व टीम परिश्रम घेत आहे. रुग्णांनीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करावी.-डॉ. कमलाकर आंधळे ,जिल्हा क्षयरोग अधिकारी, बीड