बीड : महिला अंत्याचाराच्या गुन्ह्यातील वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा आहे. दरम्यान जवळपास ९७ टक्के अत्याचार हे परिचित असलेल्यांकडूनच केले जात असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या गुन्ह्यातील अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत आहेत.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील आकडेवारी देखील धक्कादायक असून, मागील वर्षी ८८० गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत. तर, २०१९ मध्ये ८११ गुन्हे दाखल आहेत. यावर्षी आतापर्यंत १७२ गुन्हे दाखल झालेले आहेत. या सर्वच गुन्ह्यातील जवळपास ९७ टक्के अत्याचार हे परिचितांकडून केल्याचे दाखल झालेल्या गुन्ह्यातून निदर्शनास आले आहे. तसेच ईभ्रतीपोटी परिचितांकडून झालेले अनेक गुन्हे दाखल देखील केले जात नसल्याचे वास्तव आहे. बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची संख्या देखील मोठी असून, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. या घटना घडू नयेत यासाठी विशेष उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. परिचितांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात स्व:हा सतर्क राहणे देखील गरजेचे आहे. तसेच असा प्रकार घडल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या घटनेला वाचा फोडण्याची आवश्यकाता असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.
अत्याचार, विनयभंग अशा काही घटनांमध्ये खोटे गुन्हे दाखल केल्याचे देखील उघड झालेले आहे. त्यामुळे खऱ्या पीडितेकडे बघण्याचा दृष्टीकोण देखील बदलत आहे. त्यामुळे शासनाने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करावी तसेच गुन्हा खरा असेल तर पीडितेचे पुर्नवसन करून तत्काळ गुन्हे निकाली काढावेत अशी मागणी संभाजी ब्रिगडेचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांनी केली आहे.
वर्षनिहाय आकडेवारी
घटना २०१९- २०२०
बलात्कार १०६ १२९
विनयभंग २५६ ३०४
हुंडाबळी ९ १०
बलात्काराच्या घटना २०५
अपरिचितांकडून ०२
लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार
लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याच्या घटना देखील वाढलेल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे जास्त आहेत. तर, अनेक गुन्ह्यात पुन्हा तडजोड होऊन गुन्हे मागे देखील घेतले जातात. तर, लग्नाचे अमिष दाखवून अत्याचाराचे २०१९ ते २०२१ चालू वर्षात जवळपास १९८ गुन्हे नोंद आहेत.