माजलगाव : केज तालुक्यातील देवधानोरा येथील रहिवासी असलेल्या एका ९७ वर्षीय आजोबांना अनेक आजार होते. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाली; परंतु त्यांनी केवळ सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने केवळ आठ दिवसात त्यांनी कोरोनावर मात केली. विशेष म्हणजे त्यांना एकही रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले नाही.
देवधानोरा येथील रहिवासी व सध्या केज येथे वास्तव्यास असलेल्या वसंतराव कुलकर्णी हे कळंब तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होते. ते १९८४ साली सेवानिवृत्त झाले. त्यांना हृदयाचा वीस वर्षांपासून त्रास असल्याने ते माजलगाव येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान, त्यांना शुगर, बी.पी., वाल खराब व तीन ब्लॉकेज असे आजार होते; परंतु वय जास्त असल्याने त्यांचे ब्लाॅकेज काढणे अशक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
१५ दिवसांपूर्वी वसंतराव त्यांच्या भावाला ताप येत होता. त्यांच्या संपर्कात वसंतराव आल्याने त्यांनाही ताप येऊ लागला. त्यांचे फॅमिली डॉक्टर यशवंत राजेभोसले यांनी त्यांची तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यांनी केलेल्या टेस्टमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना तत्काळ सावरगाव येथील यशवंत कोरोना सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यांना असलेले आजार व त्यांचे वय पाहिल्यावर त्यांच्यावर उपचार करणे मोठे जिकरीचे होते. तरीपण येथील डॉ. राजेभोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर रात्रंदिवस उपचार करून त्यांना आठ दिवसांत घरी पाठवले. या दरम्यान त्यांना केवळ ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. वसंतराव यांचे शिस्तबद्ध आचरण व सकारात्मक दृष्टिकोन असल्याने त्यांनी कोरोनावर मात केली, असे डॉक्टरांनी सांगितले.
...
तुमचे वय किती आहे याचा विचार न करता आपल्याला कोरोनाचे लक्षणे दिसल्यास तत्काळ टेस्ट करून घ्या. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांनी बिलकुल घाबरून जाऊ नये. डॉक्टर जे सांगतात ते करा. सकारात्मक रहा. आपल्याला कोरोना कधीच हरवू शकणार नाही.
-वसंतराव कुलकर्णी, कोरोनावर मात केलेले वृद्ध.
...