बीड : गुंजेगाव पाथरवाला (ता.गेवराई) येथील गोदावरी पात्रातून वाळू उपसा करून शेवगाव (जि. अहमदनगर) येथे वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही पोलिस कारवाई न करण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितली. ही लाच घेताना खासगी इसमास रंगेहाथ पकडले तर लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. बुधवारी सकाळी हवालदाराला पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी निलंबित केले.
मुकेश काशिनाथ गुंजाळ असे पोलिस हवालदाराचे तर प्रमोद विठ्ठलराव कोठेकर (वय २७, रा.गेवराई) असे पकडलेल्या खासगी इसमाचे नाव आहे. तक्रारदाराचे हायवा टिप्पर आहे. त्यातून वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी गुंजाळ यांनी १५ हजार रुपयांचा हप्ता म्हणून लाच मागितली. याबाबत एसीबीकडे मंगळवारी सायंकाळी तक्रार आली. लागलीच खात्री करून रात्री ११ वाजेच्या सुमारास गेवराई येथील शासकीय विश्रामगृहासमोर लाच स्वीकारताना खासगी इसमास रंगेहाथ पकडले. तर गुंजाळ अद्यापही फरार आहेत. त्यांच्याविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी, स्नेहल कोरडे आदींनी केली.