बीड : ठेवीदारांच्या १८ लाख ५५ हजार ७९६ रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बीड येथील साईराम मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे प्रमुख साईनाथ विक्रम परभणे यांच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. गेवराई येथील ताकडगाव रोड भागातील रहिवासी सारिका राजेंद्र बोर्डे यांनी साईराम अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या गेवराई शाखेत मुदत ठेवी ठेवल्या होत्या. साईराम संस्थेचे शाखाधिकारी व चेअरमन यांनी बोर्डे यांना विश्वासात घेऊन मुदत ठेवीच रक्कम बचत खात्यात वर्ग केली. आजही या खात्यात १८ लाख ५५ हजार ७९६ रुपये शिल्लक आहेत.
वारंवार मागणी करूनही ही रक्कम ठेवीदार बोर्डे यांना मिळाली नाही. परभणे यांनी वेळोवेळी दिलेले आश्वासन फोल ठरले. त्यामुळे ठेवीदार बोर्डे यांनी मार्चमध्ये गेवराई न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात ॲड. शरद एस. काळे यांनी ठेवीदाराच्या वतीने बाजू मांडली होती. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
परंतु साईराम परभणे यांच्या वतीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणातही ॲड. काळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती रद्द केली. त्यामुळे १३ जून रोजी रात्री ८:२२ वाजता साईराम परभणे यांच्याविरुद्ध भादंवि कलम १२० बी, ४२०, ४०६, ४०९, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ नुसार गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय दीपक लंके करीत आहेत.