आष्टी (बीड) : निधन झालेल्या व्यक्तीच्या नावावरील प्लाॅटचा उतारा देण्यासाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेविकेविरोधात आज लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सोनाली अर्जून साखरे ( ३९, पत्ता रा. गवंडी गल्ली, खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर ) असे ग्रामसेविकेचे नाव आहे.
याबाबत अशी माहिती की, तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाले आहे. वडिलांच्या नावावरील प्लॉटचा उतारा तक्रारदाराने ग्रामसेविकेस मागितला. मात्र, त्या जागेचा उतारा काढून देण्यासाठी ग्रामसेविका सोनाली साखरेने ३ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. ही रक्कम त्यांच्यासाठी चांगदेव दळवी घेणार होता. याप्रकरणी अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, मा. श्री. विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि औरंगाबाद, मा. शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लाच मागणी पडताळणी अधिकारी अमोल धस, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.बीड, पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश मेहेत्रे यांनी केली.