दिंद्रुड (बीड): जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाविरुद्ध अपशब्द वापरत दोन गटात मतभेद निर्माण केले व समाजाच्या भावना दुखावल्या बाबत बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक हनुमान कालिदास फपाळ यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस स्टेशनला शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात जळगावचे स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत अनेक अपशब्द वापरले. यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज आता आक्रमक होताना दिसत असून बीडच्या माजलगाव तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्यसमन्वयक हनुमान फपाळ यांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी उपसरपंच युवराज ठोंबरे,पांडुरंग झोडगे,कुंडलिक मायकर, दत्तात्रय ठोंबरे,राज झोडगे, अतुल चव्हाण,बाबा कांबळे याप्रसंगी दिंद्रुड पोलीस स्टेशनला तळ मांडून होते.