- सोमनाथ खताळबीड : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा झाला. याचे पडसाद राज्यभर उमटले; परंतु बीड जिल्ह्यात पोलिस आणि आंदोलकांमध्ये एकोपा असल्याचे समोर आले आहे. रविवारी गेवराई तालुक्यातील गुळज परिसरातील गोदापात्रात मराठा समाजबांधवांनी जलसमाधी आंदोलन केले. हे आंदोलन शांततेत पार पडल्याने आणि चोख बंदोबस्त ठेवल्याने आंदोलकांनीच पोलिसांचा पाहुणचार केला.
प्रत्येकाला दाल-बाटीच्या जेवणाची मेजवानी देऊन परत पाठविण्यात आले. विशेष म्हणजे आंदोलक आणि पोलिस एकाच पंगतीला बसले होते. अंतरवाली सराटी गावात झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी अगोदरच सर्व समाज बांधवांची बैठक घेतली. त्यांना सूचना करण्यासह बंदोबस्त वाढविला. शांततेत आंदोलन झाल्याने प्रशासनातील सर्वांनाच पाहुणचार म्हणून जेवण देण्यात आले.