बीड : हैदराबाद येथे दुचाकी चोरून बीडमार्गे राजस्थानकडे निघालेल्या धूमस्टाइल चोरट्यास धुळे- सोलापूर महामार्गावरील हिंगणी हवेली फाट्याजवळ २६ सप्टेंबर रोजी नागरिकांनी पकडले. त्याचा एक साथीदार पळून गेला. पकडलेल्या चोरट्यास बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सावरलाल भगीरथराव (२४,रा. जैसलागाव, जि. जोधपूर, राजस्थान) असे या आरोपीचे नाव आहे. तो पळून गेलेल्या साथीदारासमवेत हैदराबाद येथे कामासाठी गेलेला होता. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी हैदराबाद येथून त्या दोघांनी एक दुचाकी चोरी केली. त्यावरून ते बीडमार्गे राजस्थानकडे जात होते. २६ रोजी दुपारी साडेबारा वाजता ते पाडळसिंगी (ता.गेवराई) येथील टोलनाक्यावर पोहोचले. तेथे महामार्ग पोलीस वाहनांची तपासणी करत होते, त्यांना पाहून दोघांनी दुचाकी वळवून पुन्हा बीडकडे सुसाट निघाले. मात्र, याचदरम्यान बीडकडे निघालेल्या एका कारचालकाने त्यांच्या संशयास्पद हालचाली हेरल्या व पाठलाग सुरू केला. हिंगणी हवेली फाट्याजवळ कार आडवी लावून रोखले असता सावरलाल भगीरथराव हाती लागला; पण त्याचा साथीदार पळून गेला. दरम्यान, बीड ग्रामीण ठाणे व डायल ११२ वर संपर्क केला. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेत सावरलाल यास ताब्यात घेतले.
हैदराबादची टीम बीडकडे रवानासावरलाल भगीरथराव याची पो. नि. संताेष साबळे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक पवन राजपूत यांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी हैदराबाद पोलिसांना कळवले. त्याचा ताबा घेण्यासाठी हैदराबादहून पोलीस पथक बीडकडे रवाना झाले असल्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे यांनी सांगितले.