माजलगाव: तालुक्यातील पवारवाडी येथील काही मित्र धूलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेतात पार्टी करायला गेले. यावेळी शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात आले. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचे पुढे आले आहे. कुंडलिक भीमराव धुमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धूलिवंदनाच्या दिवशी सोमवार असल्याने अनेकांनी मंगळवारी पार्टी करण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे पवारवाडी येथील काही मित्रांनी मिळून मंगळवारी अशोक खामकर यांच्या शेतात पार्टीचे आयोजन केले होते. दुपारी पार्टी करत असताना कुंडलिक भीमराव धुमाळ व संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे यांच्यात बोलता बोलता वाद झाला. वाद एकदम टोकाला गेल्याने महेशने जवळच असलेल्या शेततळ्यात कुंडलीक धुमाळ यास ढकलून दिले.
पाण्यात पडताच कुंडलीक घाबरला याचवेळी महेशने त्याच्या अंगावर उडी मारली. यामुळे पाण्यात खाली बुडून तोंडात व नाकात पाणी गेल्याने कुंडलीक याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अचानक पाण्यात बुडून कुंडलीकचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक आणि पोलिसांना सांगण्यात आले. परंतु, कुंडलीक यास पोहता येत असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी बुडून मृत्यू होऊ शकत नाही, अशा आक्षेप घेत हंबरडा फोडला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले. यातून कुंडलीक याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी महेश मोरे यास अटक केली.
याप्रकरणी भीमराव साधू धुमाळ यांच्या फिर्यादीवरून संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल हे करत आहेत.