परळी (बीड): तालुक्यातील मांडेखेल येथे आठ नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोकनाट्य तमाशामध्ये गाणे चालू असताना स्टेजवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्याला समजावून सांगत असताना जोरदार हाणामारी झाली. यावेळी दगडांचा वर्षाव करून तलवार व कोयत्याचा वापर करण्यात आला. यात दोघेजण जखमी झाले असून पोलिसांनी पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मांडेखेल येथे आसूदेवी माताची यात्रा भरली आहे. ८ नोव्हेंबर रोजी यात्रेत सामाजिक कार्यकर्ते राहुल आत्माराम कराड देवीच्या दर्शनासाठी वडिल आत्माराम कराड व नातेवाईकांसह आले होते. तेथे चालू असलेल्या लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये गावातील विष्णू रासेराव मुंडे हा व्यासपीठावर चढून गोंधळ घालत होता. विष्णू मुंडे यास आत्माराम कराड हे समजून सांगत होते. तेव्हा गावातील दीपक जीवराज नागरगोजे आणि अनोळखी दहा ते पंधरा लोकांनी दगडफेक करत तलवार, कोयत्याने हल्ला केला. दरम्यान, लोकनाट्य तमाशाच्या ठिकाणी गोंधळ उडाल्याची माहिती मिळताच एपीआय मारुती मुंडे, एएसआय पोळ, गीते आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारवाई करत तणावग्रस्त स्थिती शांत केल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, या हल्ल्यात राहुल आत्माराम कराड ( गोपाळपूर ता परळी )व त्यांचे मामा काशिनाथ मुंडे हे दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राहुल कराड यांच्या फिर्यादीवरून दीपक नागरगोजे आणि इतर दहा ते पंधरा जणांवर गुन्ह्याची नोंद परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात दि. 9 रोजी रात्री 10 वाजता करण्यात आली. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.