परळी (बीड) : तालुक्यातील पांगरी येथील वाण नदीच्या पात्रात बंधाऱ्याजवळ मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका शेतमजुराचा सोमवारी रात्री पाण्यात पडून मृत्यू झाला. शेषराव पाचांगे (६५, रा. पांगरी ) असे पाण्यात मृताचे नाव आहे.
पांगरी येथील शेषराव पाचांगे हे शेतमजूर म्हणून काम करीत असत. ते सोमवारी सायंकाळी मासे पकडण्यासाठी जाळे घेऊन पांगरी येथील वाण नदीच्या पात्रात बंधाऱ्याजवळ आले. तेथे पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच परळी ग्रामीण पोलिसांनी तातडीने भेट दिली. पाऊस चालू असताना परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, बीट अंमलदार केकाण यांनी नदीपात्रात उतरून पाचांगे यांचा मृतदेह बाहेर काढला. मृताच्या पश्चात पत्नी-दोन मुले, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
गेल्या वर्षी ही पांगरी येथील वाण नदीच्या पात्रात गुरांना पाण्यात धुवायला घेऊन गेलेल्या एका गुराख्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज शेतमजुराचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.